अहेरी : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्याला मोठ्या पूरस्थितीचा सामना करावा लागला. सलग तीन दिवस तालुक्याचा बाहेरील जगाशी संपर्क तुटल्याने आलापल्ली ते भामरागड (एनएच-१३० डी) राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आता १ ऑगस्ट रोजी पूरस्थिती हळूहळू पूर्वपदावर येताच या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, रस्ता सुरू झाला असला तरी प्रवासाचा धोका कायम असल्याचे चित्र आहे.
आलापल्ली ते भामरागड या सुमारे ६५ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत. काही झाडे रस्त्यालगत तर काही झाडांच्या फांद्या थेट रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः वळणाच्या ठिकाणी आणि रात्रीच्या वेळी ही झाडे अपघाताला निमंत्रण देत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पूर ओसरल्यानंतर वाहतूक सुरू होऊनही संबंधित विभागाने अद्याप रस्त्यावरील कोसळलेली झाडे आणि धोकादायक फांद्या हटविण्याबाबत तातडीने कारवाई केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच संबंधित विभागाला जाग येणार काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
भामरागड हा अतिदुर्गम आणि संवेदनशील तालुका असून, आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग हा तालुक्याचा प्रमुख दळणवळण मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरील अडथळे तातडीने दूर करून रस्ता सुरक्षित करणे आवश्यक आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित यंत्रणा कार्यान्वित करून कोसळलेली झाडे हटवावीत, रस्ता पूर्णपणे सुरक्षित करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.













