गडचिरोली: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून जिल्ह्यातील १८ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याने रस्त्यांवरील पूल आणि सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटला असून प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
विशेषतः अहेरी, आलापल्ली, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, कोरची, चामोर्शी आणि आरमोरी तालुक्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरूच असल्याने पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अहेरी तालुक्यातील आलापल्ली, नागेपल्ली तसेच अहेरी शहरातील अनेक प्रभागांमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्याची वेळ आली असून स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून पूरग्रस्त भागांवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत पूर आलेले पूल, नाले किंवा रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या बंद असलेले प्रमुख मार्ग
गडचिरोली–धानोरा राष्ट्रीय महामार्ग 930 (रांगी नाला)
आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग 353C (मोसम नाला, टेकमपल्ली नाला)
आष्टी–आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग 353C (दिना नदी)
कुरखेडा–वैरागड राज्यमार्ग 377 (सती नदी)
कोरची–बोटेकसा राज्यमार्ग 314 (भिमपूर नाला)
एटापल्ली–आलापल्ली राज्यमार्ग 363
धानोरा–रांगी राज्यमार्ग 368
बेटकाठी नाला (कोरची)
कुरखेडा–तळेगाव–चारभट्टी मार्ग
रोमपल्ली–झिंगानूर मार्ग
एटापल्ली–गट्टा राज्यमार्ग 381 (बांडिया नदी पूल, अलदंडी पूल)
मुलचेरा–आलापल्ली राज्यमार्ग 370
अहेरी–देवलमारी–वट्रा मार्ग (व्यंकटापूर नाला)
पोटेगाव–देवापूर–घोट मार्ग
आलापल्ली–अहेरी–देवलमारी मार्ग (लक्ष्मण नाला, नागेपल्ली नाला)
आष्टी–ईल्लूर–चौडमपल्ली मार्ग
गणपूर–विठ्ठलपूर मार्ग
वैरागड–देलणवाडी मार्ग













