गोंडपिपरी : भंगाराम तळोधी येथील १९ वर्षीय महिलेच्या विनयभंग व जबरदस्ती करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपावरून भाजपचे गोंडपिपरी तालुका महामंत्री भानेश पोचू येगेवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.या प्रकरणात महिला शहर काँग्रेस कमिटी,गोंडपिपरीच्या वतीने आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करून कडक शासन करण्यात यावे,अशी मागणी करण्यात आली आहे.
महिला शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्यामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक,चंद्रपूर यांना निवेदन सादर केले.सत्ताधारी पक्षाशी संबंधित पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप झाल्याने या प्रकरणाची निष्पक्ष व दबावमुक्त चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असून आरोपी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असला तरी कायद्यापुढे सर्व समान आहेत.त्यामुळे राजकीय प्रभावाचा वापर होऊ न देता पीडितेला न्याय मिळवून द्यावा,तसेच आरोपीवर कठोर कारवाई करावी, फरार आरोपीला तत्काळ अटक करावी अशा मागणी चे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश कराडे यांना आज दि.३० मंगळवारी महिला काँग्रेसच्या वतीने महिला शहर अध्यक्ष माधुरी गडेकर,नगरसेविका वनिता वाघाडे,कल्पना गेडाम,निर्मला नखाते,छाया बोरकुटे प्रेमीला आलम,रेखा फाले भारती भोयर,मीराबाई ठोंबरे यांनी केली.













