अहेरी : नवीन शैक्षणिक सत्र २०२६-२७ च्या प्रारंभी मंगळवार (३० जून) रोजी गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, स्वागतपर उपक्रम आणि आनंदमय वातावरणात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र अहेरी तालुक्यातील वेलगूर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोदुमडगु येथील एका अनोख्या उपक्रमाने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
शाळेत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पायांना रंग लावून त्यांच्या पाऊलखुणा कॅनव्हासवर उमटवून त्या कायमस्वरूपी जतन करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची पहिली पायरी आणि पहिल्या दिवसाच्या आठवणी जपण्याचा हा अभिनव प्रयत्न उपस्थितांच्या पसंतीस उतरला.
शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार अहेरी तालुक्यात गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सवानिमित्त अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. सनदी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच गटसाधन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देत कार्यक्रमांना उपस्थिती लावली.
वेलगूर केंद्रात केंद्रप्रमुख आशिष येल्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, टाळ्यांचा कडकडाट आणि विविध स्वागतपर उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात स्वागत करण्यात आले. मात्र मोदुमडगु शाळेतील ‘पाऊलखूण जतन’ या संकल्पनेने पालक, मान्यवर आणि उपस्थितांचे विशेष कौतुक मिळविले.या कार्यक्रमाला विशेष तज्ज्ञ राजू नागरे, मुख्याध्यापक श्रीनिवास गौतम, सहाय्यक शिक्षिका सपना अडीचेर्लावार, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेतील शिक्षकांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात या प्रतीकात्मक पाऊलखुणांपासून होत असून, भविष्यात या आठवणी विद्यार्थ्यांसह पालकांसाठीही प्रेरणादायी ठरतील. शिक्षणासोबत भावनिक नाते जपणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात कायमची छाप उमटवून गेला.













