अहेरी : दुर्गम आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि जिद्दीची कमतरता नसते, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. अहेरी तालुक्यातील रामपूर (पोस्ट–बोरी) येथील कु. आचल सविता संजय मोहुर्ले यांनी आपल्या अथक परिश्रम, चिकाटी आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था, संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर निवड मिळवत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या आचल यांनी यशाचा मार्ग निवडताना कोणताही शॉर्टकट स्वीकारला नाही. सातत्यपूर्ण अभ्यास, स्वतःवरील विश्वास आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर त्यांनी प्रत्येक टप्प्यावर यश मिळवत ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.आचल यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, बोरी येथे झाले. त्यानंतर राणी दुर्गावती विद्यालय, आलापल्ली येथे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून दिशा एज्युकेशन, वरोरा येथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी पीपल्स कॉलेज ऑफ फॉरेन्सिक सायन्स, संभाजीनगर येथून बी.एस्सी. फॉरेन्सिक सायन्स पदवी प्राप्त केली. त्यानंतर शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था, संभाजीनगर येथून एम.एस्सी. फॉरेन्सिक सायन्स या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
विद्यार्थीदशेत त्यांनी संशोधन क्षेत्रातही आपली छाप उमटवली. राज्यस्तरीय ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेत कांस्यपदक पटकावत त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. बुलढाणा येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही त्यांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी UGC-NET परीक्षा उत्तीर्ण होत मोठे यश संपादन केले. या यशाच्या बळावर आता त्यांची शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था, संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाली आहे.
दुर्गम भागातील एका विद्यार्थिनीने जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे अनेक ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसमोर प्रेरणेचा आदर्श निर्माण झाला आहे. योग्य ध्येय, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शिक्षणावरील निष्ठा असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नसते, हे आचल मोहुर्ले यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गडचिरोली जिल्ह्यासह अहेरी तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.













