गडचिरोली:जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात २९ जून ते १३ जुलै २०२६ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७(१) व ३७(३) अंतर्गत जमावबंदी आदेश लागू केला आहे.
या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली असून, शस्त्रे, स्फोटक अथवा दाहक पदार्थ बाळगणे, प्रक्षोभक घोषणा, भाषणे, फलक किंवा प्रतिमांचे प्रदर्शन करण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही मिरवणूक अथवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
जिल्ह्यात शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.













