गडचिरोली : वडसा रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९ (रेल्वे अंडरपास) येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतुकीवरील निर्बंधांची मुदत १० जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.
पावसाळ्यात अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून रस्त्यावर खड्डे पडत असल्याने वाहनचालकांना जीवघेणा धोका निर्माण होत आहे. रस्त्याची दुरुस्ती अधिक दर्जेदार व टिकाऊ व्हावी, यासाठी दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अनुभाग अभियंत्यांनी मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने वाहतुकीवरील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
२ जुलै ते १० जुलै २०२६ या कालावधीत अंडरपासच्या दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या खासगी व मालवाहू वाहनांच्या प्रवेशावर बंदी राहणार आहे. मात्र, प्रवासी बस, पाणीपुरवठा, महावितरण, दूरसंचार तसेच रस्ते दुरुस्तीशी संबंधित अत्यावश्यक सेवांची वाहने या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत.
प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ११५ व ११६ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला आहे.













