गडचिरोली: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड अंतर्गत कार्यरत ८ शासकीय व १६ अनुदानित आश्रमशाळांमध्ये मंगळवार, ३० जून २०२६ रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे.
नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, पुष्पगुच्छ देऊन आणि टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात येणार असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात प्रेरणादायी वातावरणात होणार आहे.
प्रवेशोत्सवाची सुरुवात प्रभातफेरीद्वारे जनजागृतीने होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना प्रेमळ वातावरणात शाळेत प्रवेश दिला जाईल.
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश, स्कूल बॅग, शूज-मोजे, पेन, पेन्सिल, स्टेशनरीसह आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास आनंददायी होणार आहे.यावेळी विद्यार्थी आणि पालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या विविध संधींची माहिती देण्यासाठी विमान प्रवासासह अभ्यास सहल, जेईई-नीट प्रवेशपूर्व प्रशिक्षण, तसेच न्युक्लियस बजेट योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामुळे उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.
प्रवेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि वसतिगृहांचे गृहपाल यांची ‘पालक अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते २९ जूनपासून संबंधित आश्रमशाळांमध्ये मुक्कामी राहून तयारीचा आढावा घेत आहेत.
कार्यक्रमादरम्यान मागील शैक्षणिक वर्षातील बोर्ड परीक्षेत प्रत्येक आश्रमशाळेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या वार्षिक नियोजन आराखड्याचे प्रकाशन करून नवीन शैक्षणिक सत्राचा औपचारिक शुभारंभ करण्यात येणार आहे.
मुख्य कार्यक्रम शासकीय आश्रमशाळा, ताडगाव येथे होणार असून, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमर राऊत हे प्रमुख उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आकर्षण निर्माण करणे, शाळेतील नियमित उपस्थिती वाढविणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार करणे हा या प्रवेशोत्सवामागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रकल्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे.













