विभागीय रेल्वे प्रबंधकांची घेतली नागपुरात भेट
नागपूर : “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना एकीकडे विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांना घरे देण्याचा आग्रह करीत आहेत आणि दुसरीकडे रेल्वे ने ४०-५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या व स्थायिक झालेल्या नागरिकांना बेघर करण्याच्या दृष्टीने नोटीस बजावणे हे अत्यंत दुःखदायी असून या कुटुंबांना दिलासा देण्यात यावा व अतिक्रमणाची कारवाई मागे घेण्यात यावी” अशी आग्रही मागणी लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज रेल्वेच्या विभागीय प्रबंधक श्रीमती ऋचा खरे यांना केली.
चंद्रपूर येथील दूध डेअरी परिसर, बल्लारपुर शहरातील शांतीनगर आणि भद्रावतीच्या माजरी खदान येथील रेल्वे भूखंडावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना बजावलेली अतिक्रमण नोटीस मागे घेऊन त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज विभागीय रेल्वे प्रबंधक श्रीमती खरे यांच्याकडे केली.
या विषयाबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालयात आ. मुनगंटीवार यांनी मंगळवार, दि. १२ एप्रिल रोजी श्रीमती खरे यांची भेट घेतली. चंद्रपुरातील दूध डेअरी परिसर, बल्लारपुर शहरातील शांतीनगर आणि भद्रावती येथील माजरी खदान येथील रेल्वे भूखंडावर गेल्या ४०-५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना रेल्वेने नोटीस पाठविली आहे; हे बांधकाम रेल्वे विभागाने काढू नये, अशी आग्रही मागणी आ. मुनगंटीवार यांनी आज केली.
या भूखंडांवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्याकडुन नियमितपणे कर वसुलीही होत आहे. अशात त्यांना अचानकपणे हटविल्यास या नागरिकांच्या उदरनिर्वाह, वास्तव्य व भविष्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे आ. मुनगंटीवार यांनी विभागीय रेल्वे प्रबंधक खरे यांच्या निदर्शनास आणून दिले. मानवीय दृष्टिकोन ठेवत येथील नागरिकांना हटविण्यात येऊ नये, असे आ. मुनगंटीवार यावेळी म्हणाले. यापूर्वी आ. मुनगंटीवार यांनी ११ एप्रिल रोजी चंद्रपुरात नागरिकांची बैठक घेतली होती. त्यावेळीच त्यांनी विभागीय प्रबंधक यांना विनंती करू असे या भूखंडावरील नागरिकांना दिले होते; या नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत हा मुद्दा लाऊन धरू, असे आ. मुनगंटीवार यांनी बैठकीनंतर सोबत असलेल्या शिष्टमंडळास सांगितले; मुद्दा निकाली निघेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे यावेळी आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. बल्लारशाहतील शांतीनगर, मूल, माजरी येथील रेल्वे भूमिवरील नागरिकांबाबत यापूर्वी आ. मुनगंटीवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती, हे विशेष.
रेल्वेच्या विभागीय कार्यालयात आज झालेल्या बैठकीला आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, जिल्हा भाजपा अध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपमहापौर राहुल पावडे, प्रकाश धारणे, काशी सिंग, नीलेश खरबडे, अशिष देवतळे, अजय दुबे, राहुल घोटेकर,प्रमोद क्षीरसागर, प्रा रवि जोगी, स्वप्नील कांबळे, रामकुमार अक्कापल्लीवार,
तसेच जलनगर चंद्रपूर आणि शांतीनगर बल्लारपूर येथील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते