.दनांक १३ एप्रिल २०२२
वर्धा :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव अभिजित फाळके पाटील यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेब यांची वर्धा जिल्ह्यातील विविध प्रलंबीत प्रश्नांसंदर्भात भेट घेवून सविस्तर चर्चा करीत निवेदन सादर केले.
सविस्तर वृत्त असे की या भेटी दरम्यान राज्य दरबारी वर्धा जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, निधी अभावी अथवा तांत्रिक अडचणीमुळे रखडलेल्या योजना, शेतीशी निगडित प्रश्न तसेच वर्धा जिल्हा विकासाच्या दृष्टीकोनातून चर्चा झाली. यावेळी प्रामुख्याने अभिजित फाळके पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धडक सिंचन योजने मार्फत विहिरीचे बांधकाम केले असून निधी अभावी त्यांना अनुदान मिळाले नसून त्यासाठी ३६ कोटी रूपयाचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच जिरेनियम झुडपी वनस्पती ही विदर्भातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिति सुधारण्यासाठी संजीवनी ठरु शकते त्यासाठी महाराष्ट्र सरकार मार्फत जिरेनियम झुडपी वनस्पति लागवडीसाठी विदर्भातील शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मिळावे अशी मागणी करण्यात आली. तसेच कारंजा शहरातील रखडलेली पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर मार्गी लावून नागरिकांची पाण्यासाठी होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी सुद्धा या भेटी दरम्यान खा. शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. शरद पवार यांनी सगळ्या मागण्या लक्षात घेत लगेच खात्याशी संबंधित मंत्री यांना ताबडतोब प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. यावेळी बैठकीस सहकार व पणन मंत्री मा. बाळासाहेब पाटील सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.