अहिल्यानगर :विधानसभा निवडणुकीचा हंगाम संपला. आता साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात २३ पैकी केवळ १६ कारखान्यांचीच धुराडी पेटली आहेत. दराबाबत कोणी अवाक्षरही काढलेले नाही.
या निवडणुकीत बहुतांशी साखर कारखानदारांचा पराभव झाल्याने आणखीच शांतता पसरली आहे.
निवडणुकीमुळेच यंदाच्या हंगामास उशीर झाला. हंगामाच्या तोंडावर निवडणुका आल्याने दराबाबत चढाओढ लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. उलट ऊस हंगमाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. बहुतांशी साखर कारखानदार हे विधानसभेसाठी उमेदवार होते. त्यांच्याकडून दर जाहीर झाला नाही. आचारसंहितेमुळे कदाचित त्यांना अडचण आली असावी. परंतु शेतकऱ्यांत यंदा कोणता कारखाना किती दर देतो, याची उत्सुकता आहे.
जिल्ह्यातील तब्बल २२ कारखाने परवान्याच्या प्रतीक्षेत होते. त्यापैकी केवळ सोळा कारखान्यांनाच गळीताचा परवाना मिळाला आहे. साखर आयुक्त कार्यालयाच्या पोर्टलवर जिल्ह्यातील २२ कारखान्यांनी गळितासाठी परवाना मागितला होता. त्यातील १६ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे.
जिल्ह्यात १३ सहकारी आणि ९ खासगी, असे २२ कारखाने आहेत. त्यांनी सर्वांनी परवान्यासाठी अर्ज केला आहे. मंत्री गटाने १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्यास परवाना होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने परवाना मिळाला. उर्वरित कारखान्यांचे परवाने प्रलंबित आहेत.
नगर जिल्ह्यात यंदा १ लाख ४२ हजार ६४९ हेक्टरवरील ऊस गळीतासाठी उभा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस कमी नाही. गेल्या वर्षी १ लाख ५० हजार हेक्टरवर ऊस होता. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कारखानेही कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे.
जिल्ह्यात अंबालिका, बारामती, मुळा, ज्ञानेश्वर, नागवडे, थोरात, कोल्हे, काळे हे कारखाने उसाला चांगला दर देण्यात आघाडीवर असतात. मात्र, त्यातील बहुतांशी कारखानदारांना या निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागले. ऊसदराबाबतची कोंडी कधी फुटते, याविषयी उत्सुकता लागली आहे. कुकडीचे राहुल जगताप, नागवडेचे अनुराधा नागवडे, केदारेश्वरचे प्रताप ढाकणे, ज्ञानेश्वरचे चंद्रशेखर घुले, मुळाचे शंकरराव गडाख, प्रसादचे प्राजक्त तनपुरे, थोरातचे बाळासाहेब थोरात यांचा या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. त्याचा दरावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे
श्रीगोंदे तालुक्यातील ओंकार आणि कुकडी साखर कारखान्यांचे परवाने रखडले आहेत. त्यांचे प्रस्ताव कारखानास्तरावरच आहेत. विविध योजनांचा निधी न भरल्याने त्यांचे प्रस्ताव परत पाठवले आहेत. त्यात संगमनेर तालुक्यातील गजानन कारखान्याचाही समावेश आहे. केदारेश्वर, स्वामी समर्थ, वृद्धेश्वर आणि गणेश कारखान्याचा परवाना आयुक्त स्तरावर प्रलंबित असल्याचे सूत्रांनी सांगितले. कागदपत्रांची पूर्तता झाल्यास परवाने दिले जाणार आहेत.
प्रवरा, कोल्हे, अशोक, नागवडे, थोरात, अगस्ती, मुळा, काळे, गौरी शुगर, ज्ञानेश्वर, क्रांती, प्रसाद, ढसाळ, अंबालिका, गंगामाई, बारामती (हळगाव), नाशिकमधील द्वारकाधिश, नाशिक व एस. जे. या कारखान्यांना गळीताचे परवाने मिळालेले असुन हे कारखाने नगर कार्यालयाअंतर्गत येतात.