मूल :मूल शहरातील सोमनाथ रोड मार्गावर सुरू असलेल्या रेतीच्या जड वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ही वाहतूक तात्काळ बंद करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सोमनाथ रोडवरून दिवसरात्र रेतीने भरलेली अवजड वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने शहरातील नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे.
या अवजड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सोमनाथ रोडवरील रेतीची जड वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी किंवा या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रशासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनाची प्रत सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांनाही देण्यात आली आहे.













