मूल : तालुक्यातील मौजा रामपूर तुकूम गावालगत अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ८ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजताच्या दरम्यान मौजा रामपूर तुकूम परिसरात दीपक प्रेमचंद चुगाणी यांच्या मालकीचा एक ट्रॅक्टर अवैध रेतीची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी, विहिरगाव तुकूम यांनी तत्काळ कारवाई करत संबंधित ट्रॅक्टर पकडला.
यानंतर सदर ट्रॅक्टर जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय, मूल येथे जमा करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन व वाहतुकीत गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली असून महसूल विभागाने अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
प्रकरणी नियमानुसार पुढील चौकशी व दंडात्मक कार्यवाही सुरू असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.













