अहेरी: महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज” अभियानाला वेग आला असून अहेरी तालुक्यात ८ ग्रामपंचायतींचे कामकाजाचे सखोल मूल्यमापन सध्या सुरू आहे.
ग्रामीण विकासाला चालना देणे, पारदर्शक प्रशासन साधणे आणि ग्रामपंचायतींच्या कार्यक्षमतेचा अचूक आढावा घेणे हीच या अभियानाची मुख्य उद्दिष्टे आहेत. विविध विभागांचे अधिकारी गावोगावी भेटी देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन तपासणी करीत आहेत.यामुळे आता पंचायतराज व्यवस्थेला खऱ्या अर्थाने बळकटी मिळणार आहे.या अभियानांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पंचायत समिती महागांव येथील तज्ज्ञ पथक नुकतेच अहेरी तालुक्यात दाखल झाले. पथकाचे नेतृत्व पंचायत समिती महागावचे गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम करत आहेत. त्यांच्यासोबत पंचायत विस्तार अधिकारी सुरेश चव्हाण, विस्तार अधिकारी (सांस्कृतिक) अशोक जाधव, कनिष्ठ अभियंता ओंकार टेकाळे व निलेश नरवाडे आणि पत्रकार (दैनिक पुण्यनगरी) यांचा समावेश आहे. हे पथक शासनाच्या निश्चित निकषांनुसार ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कामकाजाचा, विकास योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत आहे.
यामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतागृहांची उपलब्धता, पाणीपुरवठा योजनांची कार्यान्वित स्थिती, शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती आणि शिक्षणाची गुणवत्ता या सर्व बाबींची पडताळणी केली जात आहे.पथकाने तालुक्यातील महागाव बु., मेडपल्ली, खमनचेरू, राजपूर (पॅच), किस्टापूर (वेल), देवलमारी, रेपणपल्ली आणि पेरमिली या ८ ग्रामपंचायतींना भेटी दिल्या. येथे ग्रामपंचायतींच्या कार्यालयात मागील वर्षांच्या निधी खर्चाचा हिशेब तपासला गेला. शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी, मध्यान्ह भोजन योजना आणि खेळाची सुविधा यांचे मूल्यमापन केले. ग्रामस्थांशी संवाद साधून रस्ते, वीजपुरवठा आणि आरोग्य केंद्रांच्या सुधारणांसाठी सूचना घेतल्या. या भेटींमुळे ग्रामपंचायतींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, “सर्वोत्तम पंचायत” ठरविण्याची स्पर्धा तापली आहे.
हे अभियान ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धात्मक आणि विकासाभिमुख वातावरण निर्माण करेल.त्यामुळे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा सुधारतील आणि याचा फायदा स्थानिक ग्रामस्थांना होईल,अशी आशा आहे.













