धुळे/साक्री प्रतिनिधी – उमाकांत अहिरराव
साक्री तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढत असून, वैद्यकीय पदवी नसतानाही अनेकांनी क्लिनिके थाटून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे. या गंभीर प्रकारामुळे ग्रामीण भागातील निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात आले असून, आरोग्य प्रशासनाच्या भूमिकेवर संतप्त प्रश्न उपस्थित होत आहेत.
तालुक्यात अनेक ठिकाणी तथाकथित मुन्नाभाई डॉक्टरांकडून औषधोपचाराच्या नावाखाली चुकीची औषधे देणे, अनधिकृत उपचार करणे आणि गंभीर रुग्णांना चुकीच्या पद्धतीने हाताळणे असे प्रकार उघडपणे सुरू आहेत. या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई केली जात असताना, सर्वसामान्य नागरिकांची सर्रास फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असतानाही तालुका आरोग्य प्रशासनाने ठोस कारवाई केलेली नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नाकाखालीच हा अवैध व्यवसाय सुरू असताना, संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईचे धाडस का दाखवले नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
काही बोगस डॉक्टरांशी संबंधित अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याच्या चर्चांनाही गावोगावी उधाण आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकाराकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे. बोगस डॉक्टरांविरोधात कडक कारवाई न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
साक्री तालुक्यातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोग्य प्रशासनाने झोपेचे सोंग सोडून तात्काळ धडक कारवाई करत बोगस डॉक्टरांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.













