कोरपना (प्रतिनिधी – सतीश बिडकर) : गडचांदूर परिसरात अवैध धंद्यांवर अंकुश आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरने सलग कारवाया सुरू ठेवत पुन्हा एकदा कारवाईचा धडाका दाखवला आहे. दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गडचांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माशाअल्लाह बिर्याणी सेंटर समोर आयपीएल सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत जुबेर रसुल सैयद (वय २२, रा. ढुमने ले-आउट, गडचांदूर) याला पकडण्यात आले असून त्याच्याकडून सुमारे २० हजार रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला. तसेच त्याला बेटिंग आयडी पुरविणारा रोहित काकडे (रा. गडचांदूर) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २६१/२०२६ अंतर्गत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ४९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अवैध धंद्यांचा वाढता सुळसुळाट
दरम्यान, गडचांदूर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उधाण आले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. भोयेगाव, कवटाळा, पिंपळगाव रोड, नादा फाटा आदी भागांत अवैध दारू विक्री, ऑनलाईन सट्टा, झंडी-मुंडी जुगार, तसेच नाल्यांमधून अवैध माती उत्खनन सुरू असल्याचे चित्र आहे.
यासोबतच शहरातून भर दिवसा जड वाहतूक होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवडी बाजाराच्या दिवशीही ही वाहतूक सुरूच राहते. बाजारात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ठाणेदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध प्रकार सुरू असतानाही स्थानिक पोलीस प्रशासन अपेक्षित कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. “ठाणेदार सुस्त का?” असा थेट सवाल उपस्थित केला जात असून, अवैध धंद्यांना अप्रत्यक्षपणे संरक्षण दिले जात आहे का, अशी शंका व्यक्त होत आहे.
वरिष्ठांचे प्रयत्न, स्थानिक पातळीवर ढिलाई?
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन हे अवैध धंदे बंद करण्यासाठी कठोर पावले उचलत असल्याचे दिसत असताना गडचांदूर परिसरात मात्र परिस्थिती वेगळी असल्याचे दिसून येते. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशांचे पालन स्थानिक स्तरावर कितपत होते, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
गुन्हे शाखेची कारवाई
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, बलराम झाडोकार, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, किशोर वैरागडे, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर आदींचा समावेश होता.













