वरोरा : तालुक्यातील वनोजा गावाजवळ गुरुवारी (ता. १६) रात्री झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, चेतन किसनराव चावरे (वय ३६, रा. खैरी, ता. राळेगाव, जि. यवतमाळ) हे संदेश नंदेश बुरडकर (वय अंदाजे ३५) यांच्यासोबत मोटारसायकल क्र. MH 36 D 5653 ने वरोरा येथून खैरीकडे जात होते. दरम्यान, वनोजा गावाजवळ रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास माढळी कडून वरोरा दिशेने येणाऱ्या एका अनोळखी ट्रकने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवून मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात चेतन चावरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले संदेश बुरडकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे धाव घेतली. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चेतन चावरे यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी विजय रामाजी क्षीरसागर (रा. दहेगाव, ता. वरोरा) यांच्या तक्रारीवरून वरोरा पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी ट्रक चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.













