अहेरी: एकीकडे दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून तापमानाचा पारा 43 अंशावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे विजेचा लपंडाव सुरू असल्याने उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. एकंदरीत महावितरणाचा भोंगळ कारभाराबाबत नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.

सध्या राज्यभरात तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सरासरी 40 अंशाच्या आसपास असणारे तापमान आता 43 अंशाच्या पार गेले आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिक घामाघुन झाले असून अंगाची लाहीलाही होत असताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे दुपारच्या बारा ते सायंकाळी साडेचार या वेळेत सूर्याची प्रकर किरणे आणि उष्ण वारे वाहत असल्याने नागरिक घराबाहेर पडत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्याने आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन देखील केले आहे. तर येत्या काही दिवसात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अशा परिस्थितीत वीज वितरण विभागाने वीज खंडित होऊ नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. उलट वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. अहेरी,आलापल्ली शहरातच नाही तर खेड्यापाड्यात देखील मोठ्या प्रमाणात वीज खंडित होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.तर काही भागात विजेच्या कमी दाबाने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे महावितरणाचा भोंगळ कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सकाळी 8 वाजले की उन्हाची तीव्रता वाढत आहे.मात्र वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने उकाड्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना देखील उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.लहान लहान चिमुकले देखील घामाघूम होत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.













