भामरागड (गोविंद चक्रवर्ती) :-
भामरागड तालुक्यातील १२८ गावांच्या नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेले ग्रामीण रुग्णालय स्वतःच आजारी असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव असून, केवळ परिचारिका आणि आधीपरिचारिकांच्या भरवश्यावर उपचार सुरू आहेत. परिणामी, रुग्णालय अक्षरशः ‘रामभरोसे’ चालत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
तालुक्यातील सर्व नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने येथे ४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २० उपकेंद्रे आणि २ आरोग्य पथके कार्यरत आहेत. या केंद्रांतून रेफर झालेल्या रुग्णांना उपचारासाठी भामरागड येथील ३० खाटांची ग्रामीण रुग्णालय व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, तालुक्याची लोकसंख्या आणि रुग्णसंख्या लक्षात घेता या रुग्णालयातील सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत.
ग्रामीण रुग्णालयातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वैद्यकीय अधिकारी, मात्र सध्या रुग्णालय चालविण्यासाठी उसणवारीवर आलेल्या डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागत आहे. एकूण पाच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याचे दाखले आहेत, पण प्रत्यक्षात अनेकवेळा त्यांपैकी कोणीही ड्युटीवर नसतो.
आज हप्त्याचा पहिला दिवस असल्याने रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी झाली होती. मात्र एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रुग्णांना तासन्तास उपचाराविना बसून राहावे लागले. अनेक रुग्णांना त्यांच्या शारीरिक वेदना सहन करतच वाट पाहावी लागल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
दरम्यान, येथे कार्यरत असलेले डॉ. हर्षल सडमेक स्वतः आजारी पडल्याने त्यांनाच सलाईन लावून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे दृश्य स्थानिक नागरिकांनी पाहिले. मात्र उर्वरित चार डॉक्टर एकाच वेळी गैरहजर कसे राहू शकतात, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
स्थानिकांनी रोष व्यक्त करत म्हटले की, रुग्णालयात डॉक्टर नसून फक्त परिचारिका आणि आधीपरिचारिका काम पाहतात, मग रुग्णांची जबाबदारी कोणाची? आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
संबंधित आरोग्य विभागाने तातडीने लक्ष घालून डॉक्टरांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येईल, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.













