चंद्रपूर प्रतिनिधी – प्रणित तोडे
चंद्रपूर शहरातील जटपूरा प्रभाग क्र. 7 मधील चोर खिडकी, जवई मोहल्ला, तथागत बुद्ध विहार, सम्राट अशोक चौक, जय भीम चौक, चंद्रपूर समाचार, पवन सुत दवा बाजार व जलनगर या भागांमध्ये रहिवासी नागरिकांना घरी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी दूरवर जावे लागत आहे.
अमृत योजनेअंतर्गत घर तिथे नळ व नळ जल या माध्यमातून घराघरात नळांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे; मात्र, सदर नळांना पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात वारंवार पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधला गेला, तरीही त्यांचेकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. कार्यरत अभियंत्यांकडूनदेखील टाळाटाळीची उत्तरं मिळत असल्याची माहिती मिळाली आहे, ही बाब अतिशय गंभीर मानली जात आहे.
उन्हाळ्याच्या काळात ही समस्या अधिक गंभीर स्वरूपाची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच, प्रभागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या त्वरित सोडवण्याची मागणी बहुजन समाज पार्टीकडून करण्यात आली आहे.
निवेदनादरम्यान चेतावणी देण्यात आली की, पाणीपुरवठा त्वरीत सुधारला नाही, तर बसपा चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष अविनाश वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विश्वनाथ लाडे, झोन इंचार्ज किशोर चिकते, रवींद्र कुमार गाडम, अखिल निमगडे, विवेक दुपारे आणि प्रणित तोडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा मार्ग पत्कारावा लागेल.













