हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून देशभर गाजत असलेल्या वादात विनाकारण महाराष्ट्रा आणि मराठी जनतेवर टीका करणाऱ्या भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना बुधवारी संसद भवनात चांगलाच विरोधाचा सामना करावा लागला. निशिकांत दुबेंच्या वादग्रस्त विधानांवर रोष व्यक्त करत काँग्रेसच्या तीन मराठी महिला खासदारांनी संसद भवनाच्या लॉबीत दुबे ना घेरलं आणि जाब विचारला. ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला, तर दुबे यांना चक्क माघारी फिरावं लागलं.
राज्यामध्ये पहिल्या इयत्तेपासून त्रिभाषासूत्रीच्या माध्यमातून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे थेट रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर 5 जुलै रोजी हिंदीच्या सक्तीविरोधात मुंबईत दोन्ही ठाकरे बंधुंच्या पक्षाने संयुक्त मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषासूत्रीचा शासन आदेश मागे घेत असल्याची घोषणा केली. यानंतर पाच जुलै रोजी वरळीमधील डोम येथे झालेल्या संयुक्त जल्लोष मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मराठीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. याच मेळाव्यावर बोलताना दुबेंचा तोल सरकला आणि त्यांनी मराठी तसेच महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त विधानं केली.
जाणूनबुजून मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीयांविरोधात राज्यात वातावरण तापले असताना, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बिहारला यावे, तेथे त्यांना ‘पटक-पटक के मारेंगे’ असे आव्हान दुबे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिले होते. ‘महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो’ अशी दर्पोक्तीही दुबेंनी केली होती. याच दुबेंना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा भाईंदरच्या सभेत दुबे को समुंदर में डुबो डुबो कर मारेंगे असा करारी जवाब दिला होता. याच मुद्यावर बुधवारी काँग्रेस पक्षाच्या मराठी महिला खासदारांनी त्यांना खिंडीत गाठले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदार दुबे यांना शोधत होत्या. दुबे लॉबीमध्ये येताच तिघींनी त्यांना घेराव घातला आणि त्यांच्या विधानांबाबत जाब विचारला.
मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता? तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? कसली ही तुमची अर्वाच्च भाषा ? तुमचे वागणे-बोलणे योग्य नाही.
मराठी भाषकांविरोधातील तुमची ही अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही” अशा शब्दांत गायकवाड यांनी दुबेंना सुनावले. यानंतर या महिला खासदारांनी ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या साऱ्या प्रकारामुळे दुबे गोंधळून गेले आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला.
प्रकरण जास्तच वाढल्यामुळे पुन्हा निशिकांत दुबे तिथे आले आणि वर्षा गायकवाड यांनी तात्काळ पुन्हा “जय महाराष्ट्र”च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. गोंधळलेले दुबे शेवटी हात जोडत म्हणाले, “आप तो मेरी बहन हैं…” आणि तिथून निघून गेले.













