गडचिरोली:23 जुलैपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने परत एकदा हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी जून महिन्यातच पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली जातो. भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होते. मात्र यंदा जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाने उशिरा हजेरी लावल्याने 25 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास पहिल्यांदाच भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
गेल्या दोन दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. सर्वच नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अहेरी तालुक्यातील आलापल्ली शहरातील काही प्रभागात अतिवृष्टी निर्माण झाल्याने येथील 17 कुटुंबातील एकूण 64 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे.वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती आणि गोदावरी नद्यांच्या उपखोऱ्यामध्येही मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा यांनी नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे.त्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट मोडवर असून नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी असे आवाहन देखील करण्यात आले.
‘या’ तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर
भारतीय हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यासाठी २४ जुलै करिता ऑरेंज अलर्ट आणि 25 जुलै करिता रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस तसेच अत्याधिक मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 24 जुलै रोजी जिल्ह्यातील 15 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.या पावसाचा जिल्ह्यातील दक्षिण भागात जास्त फटका बसला असून या पार्श्वभूमीवर अतिवृष्टी तसेच पूर परिस्थिती बाबतची स्थानिक परिस्थिती लक्षात घेता चामोर्शी, मुलचेरा,अहेरी ,भामरागड आणि सिरोंचा यासह आदी तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.













