वरोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेगाव (बु.) येथे शुक्रवारी (दि. १९ जुलै) सकाळी सुमारास घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभय गुलाबराव दातारकर (वय ३५) याने विठ्ठल मंदिर वॉर्डातील आपल्या राहत्या घरी वडील गुलाब दातारकर (वय ६५) यांच्याशी शेतीच्या कारणावरून वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर अभयने अचानक कुऱ्हाड उचलून वडिलांच्या डोक्यावर व तोंडावर वार करत त्यांचा जागीच खून केला.
घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे पाठवला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी अभय दातारकर याला अटक केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव हे पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.













