मुलचेरा:माहिती तंत्रज्ञानाच्या युगात देशाचा झपाट्याने विकास होत असला तरी अतिमागास असलेला गडचिरोली जिल्हा या युगातही एक पाऊल मागेच आहे. इंटरनेट, सोशल मिडीया, फेसबुक, ऑनलाईन कामे ही अत्यंत गरजेची सुविधा आहे. मात्र, विजेचा लंपडाव व बत्तीगुलमुळे या सुविधांच्या उपभोग घेणे जिल्हावासीयांना अडचणीचे ठरत आहे. शासन, प्रशासनाकडून अतिमागास जिल्हाला प्रथम प्राधान्य देत हा जिल्हा संपूर्ण सोयी सुविधायुक्त करण्याचा मोठा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र, कृती शुन्यच असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाचा फटका दुर्गम भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.असच काही प्रकार मूलचेरा तालुक्यात पाहावयास मिळत आहे.मागील काही महिन्यांपासून मुलचेरा वासियांना विजेचा लपंडाव आणि बत्तीगुलमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मूलचेरा तालुक्यातील गावांना ३३ के व्ही विद्युत वाहिनीच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जात आहे. आवश्यक मनुष्यबळ असतानाही नियमित विजेचा लंपडाव तर होतेच शिवाय बत्तीगुलच्याही समस्येशी नागरिकांना सामना करावा लागत आहे.हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी आल्या तरी महावितरणकडून लगेच वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यंदा तर या भागात अजूनही दमदार पाऊस नाही.तरीही मागील एक महिन्यापासून नेहमी सुरू असलेल्या विजेचा लपंडाव,तीन तीन दिवस वीज न राहणे,कमी दाबाचा त्रास यामुळे नागरिक हैराण झाले आहे. जुलै महिन्यात ही परिस्थिती असेल तर उर्वरित ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात किती हाल होणार ? असा सवाल तालुक्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील विविध गावात उन्हाळ्यापासूनच विजेची समस्या होती, बरेचदा नागरिकांनी याबाबतची तक्रार आलापल्ली आणि मुलचेरा कार्यालयाला दिली होती. मात्र, परिस्थिती ‘जैसे थे’ अवस्थेतच आहे.जिल्ह्याच्या दक्षिण भागात पाऊस नसल्याने उकाड्यापासून नागरिक परेशान आहेत.त्यात वयोवृध्द आणि लहान मुलांचे मोठे हाल होत आहे.दररोज विजेचा लंपडाव सुरू असून अंधारातच रात्र काढावी लागत आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून महावितरणवर रोष व्यक्त केला जात आहे.
रात्रीच्यावेळी सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका
महावितरणने पावसाळ्यात नागरिकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी आताच उपाययोजना करावी, पावसाळ्यात रात्रीच्यावेळी सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंधार राहत असल्याने बाहेर जाणाऱ्या नागरिकांना सदर प्राणी निदर्शनास येत नसल्याने धोका होतो. यात नागरिकांना जीवही गमवावा लागते. ही संपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन महावितरण नागरिकांच्या जिवाची काळजी घ्यावी व पूर्वनियोजन करावे अशी मागणी केली जात आहे.
अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तर
या समस्येबाबत येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे भ्रमणध्वणीवरून कार्यालयात विचारणा केली असता त्यांच्याकडून उर्मटपणे उत्तर दिले जातात.त्यामुळे विजेची समस्या,अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयी सक्ती करण्यासाठी लवकरच महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे काही सुज्ञ ग्राहकांनी सांगितले.













