मोहोळ (नानासाहेब ननवरे): शेलगाव वांगी दहिगाव चौक हा रस्ता गेल्या अकरा वर्षापासून झाला नाही. या रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून संबंधित विभागाला गेल्या आठ दिवसापूर्वी निवेदन दिले होते. दिलेल्या निवेदनानुसार रस्त्याच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. मात्र याच पोलीस स्टेशनला कोणतीच कल्पना दिली नसल्या कारणाने अतुल खूपसे यांच्यासहित यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान 2019 ला या रस्त्यासाठी निधी मंजूर होता, मात्र त्याची विल्हेवाट न लावल्याने शेतकरी रस्त्यावर उतरले, अंगावर गुन्हे घेतले. त्यामुळे लवकर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
याबाबत वृत्त असे की, करमाळा तालुक्यातील शेलगाव दहिगाव या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या मागणीसाठी शेतकर्यांनी वारंवार प्रशासनाला साकडे घातले. मात्र रस्ता झालाच नाही. गेल्या आठ दिवसापूर्वी जनशक्ती संघटनेच्या लेटरपॅडवर काही शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. दिलेल्या निवेदनानुसार आज शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. मात्र सदरचे निवेदन पोलिस स्टेशनला न पोहोचल्यामुळे अतुल खूपसे यांना जबाबदार धरून त्यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले.
दरम्यान अतुल खूपसे पाटील जोपर्यंत आंदोलनस्थळी येणार नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा शेतकर्यांनी घेतल्याने प्रशासनाची अडचण झाली. त्यामुळे प्रशासनाने अतुल खूपसे यांना बोलावून घेतले. त्यानंतर झालेल्या बैठकीत उप अभियंता जे एस नाईकवाडी यांनी या रस्त्यासाठी 2019 मध्ये निधी मंजूर असल्याचे सांगून येत्या आठवडाभरात रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नाना तकिक, रोहिदास माने, गणेश चव्हाण, प्रदीप जगताप, अमीर पटेल, प्रवीण जाधव, गणेश जाधव, तानाजी खराडे, प्रशांत मोरे, विशाल तकिक, जनार्दन मोरे, राहुल देशमुख, दत्तात्रेय रामसिंग, प्रवीण तकिक, सुनील मोरे, अण्णा चौधरी, बाळू महाडिक, समाधान देशमुख, सागर कोथमिरे, नागनाथ केकान, आतिश सातव, नामदेव सपकाळ, पप्पू चौधरी, अमोल डावरे, सचिन जाधव आदी उपस्थित होते.