क्रिकेट विश्वात गेल्या काही दिवसांपासून सतत नव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भारत पाकिस्तान युद्धामुळे IPL अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रोहित शर्माने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत क्रिकेट जगताला धक्का दिला. आणि त्याच्या नंतर अवघ्या सहा दिवसांतच विराट कोहलीने देखील क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्याच्यानंतर कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार, हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रिकाम्या झालेल्या नेतृत्वाच्या जागी कोणत्या खेळाडूची वर्णी लागणार? कोणत्या नवीन खेळाडूंची नावे कर्णधारपदासाठी चर्चेत आहेत जाणून घेऊ या..
भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला २० जून पासून सुरूवात होणार आहे. रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता बीसीसीआयने नव्या कर्णधाराचा शोध घ्यायला सुरूवात केली.
रोहितच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदी कोण विराजमान होईल? विराट कोहली पूर्वीच या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मग या पदासाठी दावेदार कोण असेल? याची जोरादार चर्चा सुरू झाली आहे.त्यामध्ये ३ नाव प्रामुख्याने समोर येत आहेत.
जसप्रीत बुमराह…
बुमराह हा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे आणि तो कर्णधारपदाचा मुख्य दावेदार आहे. पण त्याचा फिटनेस ही मोठी समस्या आहे. इंग्लंड दौ-यावर तो पाचही कसोटी सामने खेळू शकेल की नाही याबाबत अनिश्चितता आहे. पण अनुभवाच्या जोरावर त्याला नवीन कर्णधार बनवून इंग्लंडला पाठवले जाऊ शकते.कारण तो ३ फॉरमॅट प्लेअर आहे. त्याच्याकडे अनुभव, ताकद आणि स्किल या तिन्ही गोष्टी आहेत.
बुमराहने आतापर्यंत ४५ कसोटी सामने खेळले आहेत ज्यात त्याने २०५ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने कसोटी क्रिकेटमध्येही कर्णधारपद भूषवले आहे. एवढेच नाही तर त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाच्या उपकर्णधाराची भूमिकाही बजावली आहे. अशा परिस्थितीत त्याला पुन्हा एकदा संधी मिळू शकते.
शुभमन गिल…
एकदिवसीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिल रोहितची जागा घेण्यासाठी दावेदार आहे. गिल ला मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा पाठिंबा आहे. तसेच, भविष्याकडे पाहता, गिल हा एक योग्य पर्याय आहे. तो आयपीएलमध्ये गुजरातचे नेतृत्व करत आहे आणि त्याने खूप प्रभावी कामगिरी केली आहे. गिल हा लंबी रेस का घोडा आहे. जर तो नेतृत्व करण्यात यशस्वी झाला तर भारताला दीर्घकालीन कर्णधार मिळेल. गिलने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत ३२ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५ शतके आणि ७ अर्धशतके झळकावली आहेत. कसोटी क्रिकेटमधील त्याची सरासरी ३५. ०६ आहे.
ऋषभ पंत…
या शर्यतीत ऋषभ पंत हे आणखी एक नाव आहे. जेव्हा विराट कोहलीने संघाचे कर्णधारपद सोडले तेव्हा पंतचे नाव कर्णधारपदाच्या शर्यतीत होते, परंतु रोहितने त्याला मागे टाकले. पंत हा कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे आणि तो संघातील सर्व खेळाडूंना चांगले ओळखतो. पंतने आतापर्यंत ४३ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने एकूण ४००५ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी ४२. ११ आहे. सध्या तो आयपीएलमध्ये लखनौचे नेतृत्व करत आहे. यापूर्वी त्याने रणजीमध्ये दिल्लीचे नेतृत्व केले आहे आणि टी-२० मध्येही भारताचे नेतृत्व केले आहे.













