गडचिरोली:दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील जंगल परिसरात बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना स्थानिक गुन्हे शाखेच्या कठोर पाठपुराव्यानंतर उद्ध्वस्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि प्रभारी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पार पाडली.
१४ में रोजी पोलीसांना दक्षिण गडचिरोलीतील ताडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा कुडकेली जंगल परिसरात बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू झाल्याची गोपनिय माहिती मिळाली. पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि. अरुण फेगडे, सपोनि. राहुल आव्हाड, सपोनि. भगतसिंग दुलत, विशेष अभियान पथकाने घटनास्थळी घेराव घातला. पोलीसांच्या चाहूल लागताच अंधाराचा व जंगलाचा फायदा घेऊन एक चारचाकी वाहन पळून गेले, पण त्याची पाहणी केल्यावर देशी दारुचे बॉक्स सापडले.
लाखोंचा मुद्देमाल जप्त
१५ में रोजी सकाळी ७ वाजता पंचासमक्ष छापा कारवाई करण्यात आली. या छाप्यात लाखो रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ४५०० लिटर स्पिरीट, १००० लीटर क्षमतेचे व ७५० लीटर क्षमतेचे ड्रम, ८७०० बाटल्या देशी दारू, एक पांढरी होंडा ब्रिओ चारचाकी वाहन, एक ग्रे होंडा मोटार सायकल, जनरेटर, सिलींग मशीन, विविध साहित्य समाविष्ट आहे. या सर्व मालाची एकूण किंमत ३९ लाख ३१ हजार १०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींची अटक
या प्रकरणात वसंत प्रदान पावरा, शिवदास अमरसिंग पावरा, अर्जुन तोयाराम अहिरे आणि रविंद्र नारायण पावरा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे व ताडगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आली आहे.













