राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काल आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराची सध्या राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा आहे .
या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंचं नाव अग्रस्थानी असल्याने हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला. दरम्यान उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर येणार का अशी चर्चा रंगली होती.
मात्र या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहू न शकल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलगिरीचे पत्र लिहिले असले तरी अजित पवार नाराज असल्याचे दिसून येते.
विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महायुतीत पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे. नुकताच जळगावमधील राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांच्या अजित पवार गटात प्रवेशावरून शिंदे गटाचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त करत थेट युतीधर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर दुसरीकडे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांनी आपल्या खात्याचा निधी परस्पर वळता केल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे महायुतीत काही आलबेल आहे असे दिसत नाही.
माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान कार्यक्रमाला शिंदे यांची अनुपस्थितिदेखील वेगळेच संकेत देत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर व सतीश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. मात्र, या पक्षप्रवेशानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर, संजय शिरसाठ यांनी निधी पळवापळवी वरुन अजितदादांना लक्ष्य केले.
एसटी महामंडळालादेखील निधी न दिल्याने कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात पगार देण्याची नामु्ष्की ओढावली होती. परिवहन खाते देखील शिंदे गटाकडे आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे एकत्रित वेतन न झाल्याने परिवहन मंत्री आणि सरकारविरोात कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांद्वारे, आमदारांच्या माध्यमातून अजित पवारांवर टीका सुरू झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे पुढे हे युती टिकणार कि नाही असा प्रश्न उपस्तिथ होत आहे.













