राज्यभरात आज १ मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला आजच्या दिवशीच ६५ वर्ष पूर्ण होत असून यानिमित्त राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी झेंडावंदनाबरोबरच वेगवेगळ्या संस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि अशातच संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झेंडावंदन करुन नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर महाराष्ट्र दिनाप्रमाणेच आज गुजरात राज्याचाही स्थापना दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दोन्ही राज्यांना त्यांच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राला मराठी भाषेत मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीतून शुभेच्या दिल्या आहेत. भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या, महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी आपल्या मूळाशीही घट्ट जोडलेले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा”. अस पंतप्रधान मोदी म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज मुंबईतील हुतात्मा चौक येथे पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र राज्याच्या दिनानिमित्त ध्वजारोहण करून राज्यध्वजास वंदन केले.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला व कामगार वर्गाला शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा संदेशात त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीत जनतेच्या योगदानाचे आणि विशेषतः कामगार वर्गाच्या अथक परिश्रमांचे कौतुक करताना, या भूमीच्या तेजस्वी इतिहासाचे, संस्कृतीचे आणि विकासयात्रेचे सखोल स्मरण केले.
महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी हौतात्म्यांनी दिलेल्या बलिदानांना आदरांजली अर्पण करताना फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र दिन म्हणजे आपल्या अस्मितेचा, संघर्षाचा आणि एकात्मतेचा दिवस आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या सर्व हुतात्म्यांच्या आठवणींना आज आपण मानाचा मुजरा करतो. त्यांच्याच बलिदानातून हे तेजस्वी, समृद्ध आणि प्रगत महाराष्ट्र साकार झाला आहे. त्यांनी राज्याच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय प्रगतीचे स्मरण करत म्हटले, “महाराष्ट्राने उद्योग, शिक्षण, आरोग्य, कृषी, कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक न्याय अशा अनेक क्षेत्रांत अभूतपूर्व प्रगती केली आहे. ही प्रगती शक्य झाली ती आपल्या मेहनती नागरिकांमुळे आणि मजबूत सामाजिक-सांस्कृतिक पायाभरणीमुळे तसेच राज्याच्या औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक विकासात कामगार वर्गाचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कष्टांमुळेच आज महाराष्ट्र देशातील एक महत्त्वाचा औद्योगिक केंद्र म्हणून ओळखला जातो.” ते पुढे म्हणाले, “शासन कामगारांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्या कार्यक्षमता वाढवणे, सुरक्षितता, आरोग्य, निवृत्ती वेतन, विमा योजना आदी गोष्टींत सुधारणा करणे ही आमची प्राथमिकता आहे.













