कवठे येमाई येथे जमीन वादातून हाणामारी – सात जणांविरोधात शिरूर पोलिसात गुन्हा दाखल
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील इचकेवाडी परिसरात जमिनीच्या वादातून मोठा वाद निर्माण होऊन हाणामारीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील :
दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी सुमारे 11:45 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी संतोष बाळकृष्ण इचके (वय 40 वर्षे, व्यवसाय – शेती, रा. कवठे येमाई, ता. शिरूर) हे आपल्या कुटुंबासोबत शेतजमिनीच्या वादाच्या संदर्भात गट क्रमांक 104 वर गेले होते. या गटातील रस्त्याच्या कडेला आरोपी बाबुराव सगाजी इचके, सगाजी कोंडाजी इचके, अनिता बाबुराव इचके आणि त्यांच्यासोबत असलेले इतर पाच नातेवाईक कांद्याची आरण (चाळ) बांधत होते.
फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी संबंधितांना सदर जागा त्यांच्या मालकीची असल्याचे सांगत आरण बांधू नये, असे सांगितले असता, वाद अधिक चिघळला. संतोष इचके, त्यांचे भाऊ राजेंद्र इचके, भावजई सुरेखा इचके, आई मंगल इचके आणि पत्नी रूपाली इचके यांना आरोपींनी हाताने आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी शिवीगाळ करत धमकी देण्यात आली.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 260/2025 अंतर्गत BNS कलम 115 (2), 352, 351(2)(3), 189(2), 191(2), 190 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील कारवाई :
या प्रकरणी पोलीस हवालदार शिंदे (बकल नं. 2463) यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पो.ह.वा. वारे (बकल नं. 850) हे करत आहेत.
घटनेनंतर गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून सतर्कता बाळगली जात आहे. अधिक तपास सुरू आहे.













