मूल प्रतिनिधी
मरेगाव–चितेगाव परिसरात भीतीचं सावट निर्माण करणारी आणि तीन जणांचा बळी घेणारी नरभक्षक वाघीण अखेर बुधवारी रात्री वनविभागाच्या प्रयत्नांनी जेरबंद करण्यात आली. चितेगाव येथील एका तरुणासह तिने आतापर्यंत तीन जणांचा जीव घेतला होता.
सावली–चंद्रपूर वनविभागातील सावली व चिचपल्ली वनपरिक्षेत्रात या वाघीणीनं धुमाकूळ घातला होता. सावली परिक्षेत्रात निलेश दुर्गा कोरेवार व शेषराव नागोसे या दोन व्यक्तींचा, तर चिचपल्ली परिक्षेत्रात मेंढपाळ मल्लाजी येगावार यांचा वाघीणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तसेच काही नागरिकांना जखमी देखील केलं होतं. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं.
वाघीणीला पकडण्यासाठी वनविभागाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र ती वारंवार हुलकावणी देत होती. परिणामी नागरिकांमध्ये वनविभागाविषयी नाराजी होती. अखेर बुधवारी रात्री सावली वनपरिक्षेत्रात ही वाघीण जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं.
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे आणि सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वात पार पडली. चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगावकर यांनी वाघीणीला बेशुद्ध करण्याचं काम यशस्वीरित्या पार पाडलं.
या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून, वनविभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.













