गोंडपिपरी – (सुरज माडुरवार) : गोंडपिपरी तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या वर्धा,वैनगंगा,अंधारी अशा तीन प्रमुख नद्या आहेत. तालुक्यांत मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती आहे.असं असताना तालुक्यात कुठलाच उद्योग नाही. तालुक्यातील युवकांना रोजगार नाही अशा स्थितीत एक पत्र सोशल मीडियावर औद्योगिक क्षेत्र स्थापन प्रस्तावित करण्याबाबत आशयाचे व्हायरल झाले आणि युवकांमध्ये एकीकडे रोजगार उपलब्ध होणार अशा आशा पल्लवीत झाल्या आहे तर दुसरीकडे मात्र शाशन जमिनी भुसंपादित करणार की काय या विचाराने शेतकऱ्यांमद्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील करंजी, चकपेल्लुर,बोरगाव,धानापुर, चेकबोरगाव,पातळवाडा, वडकुली,लिखितवाडा,चक वेडगाव,वढोली,तारडा,कुलथा, फुर्डी हेटी,भनारहेटी, खरारपेठ,नांदगाव,येनबोथला, घडोली,सुरगाव,विठ्ठलवाडा, नवेगाव वाघाडे,तारसा(बू),तारसा (खुर्द)कोरंबी, राळापेठ,भंगारपेठ,भंगाराम तळोदी,विहीरगाव येथे नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करणे बाबत शासन विचाराधीन असल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जागेचा भूसंपादन प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी तालुका प्रशासनाकडे गावातील संपूर्ण सर्वे नंबर प्रमाणे जमिनीचे अद्यावत सातबारे,गाव नमुना आठ-अ,गाव नकाशा पुरवण्यासाठी दि.२० फेब्रुवारी २०२५ ला कळविले होते.पत्राच्या अनुशंगाणे गोंडपिपरीचे तहसिलदार शुभम बहाकर यांनी दि.१८ मार्च २०२५ रोजी संपूर्ण गावाची गावातील संबंधित माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पाठवली असल्याने पुढे काय होणार याची उत्सुकता तालुक्यातील नागरिकांना लागली आहे.
गोंडपिपरी तालुक्यात प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी शासन विचाराधीन आहे.नियमांची पूर्तता झाल्यानंतर निकशानुसार तीन ते चार गावे प्रस्तावीत केल्या जाईल.त्यानंतर तिथे उद्योग उभारण्याच्या दृष्टीने हालचालीला वेग येईल.शेतजमीन भूसंपादन करण्यात येईल.त्या दृष्टिकोनातुन तालुक्यातील २८ गावासंदर्भात अद्यावत माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पाठवली आहे.कुठलेही गावे स्थलांतरित होणार नसून नागरिकांनी घाबरू नये.
– शुभम बहाकर,(तहसीलदार गोंडपिपरी)













