चंद्रपूर │ राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या ठोस पाठपुराव्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील उपकेंद्रासाठी ४१४ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विधानसभेत या विषयावर चर्चा करताना आ. मुनगंटीवार यांनी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यंदाच्या जुलै महिन्यात पुरवणी मागण्यांमध्ये हा निधी मंजूर केला जाईल, अशी घोषणा केली.
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपूर जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी १ जून २०२३ रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मान्यता दिली होती. या उपकेंद्रासाठी ८.५ एकर जागा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आली असून ३० मे २०२४ रोजी व्यवस्थापन परिषद आणि इमारत बांधकाम समितीनेही मंजुरी दिली होती.
विद्यापीठाच्या उपकेंद्रामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी आणि शिक्षणसंस्थांना मोठा फायदा होणार आहे. उच्च शिक्षणासाठी बाहेर जावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांना आता स्थानिक स्तरावरच दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळणार आहेत.
यासंदर्भात विधानसभेत बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,
“गोंडवाना विद्यापीठाचे चंद्रपूर जिल्ह्यात उपकेंद्र होणार आहे. यासाठी लागणारा निधी जुलैमध्ये मंजूर केला जाईल. तसेच, गोंडवाना विद्यापीठाला स्वनिधीतून खर्च करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.”
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी वाढणार असून, चंद्रपूर जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या आणखी सक्षम होणार आहे.













