महिला मजुरावर लैंगिक छळाचा प्रयत्न : शिरूरमध्ये गुन्हा दाखल
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
शिरूर (ता. शिरूर, जि. पुणे) – शांतीनगर झोपडपट्टी येथे एका २७ वर्षीय महिलेला धमकावून लैंगिक छळ केल्याची घटना घडली असून, आरोपीविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १४ मार्च २०२५ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास फिर्यादी उषा रमेश लोंढे या आपल्या राहत्या घरी होत्या. त्यावेळी आरोपी सुरेश पोपट लोंढे हा दारू पिऊन जबरदस्तीने त्यांच्या घरात शिरला. त्याने महिलेचा हात धरून अश्लील वर्तन केले व त्यांना शिवीगाळ करत धमकावले.
फिर्यादीने दिलेल्या जबाबानुसार, आरोपीने “तू माझ्या जवळ येऊन झोप” असे म्हणत लज्जास्पद वर्तन केले. त्यानंतर महिलेने विरोध करताच त्याने दमदाटी केली. घाबरलेल्या महिलेने लगेचच पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणी शिरूर पोलिसांनी गु.र.नं. १७७/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता (BNS) कलम ३३३, ७४, ३५२, ३५१(२), ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार कोथळकर (२५६०) करीत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.













