चंद्रपूर │ गेल्या सहा महिन्यांपासून थकीत वेतनासाठी संघर्ष करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांच्या खात्यात अखेर एका महिन्याचे वेतन जमा करण्यात आले आहे. मात्र, अद्याप उर्वरित वेतन मिळाले नसल्याने कामगारांमध्ये असंतोष कायम असून, त्वरित संपूर्ण थकीत रक्कम देण्याची मागणी केली जात आहे.
राज्यातील ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना मागील सहा महिन्यांपासून वेतन मिळाले नव्हते. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. शासन आणि कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे कामगारांचे हाल सुरू होते. १५ मार्च रोजी ‘भीक मांगो’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर अखेर प्रशासनाने एका महिन्याचे वेतन कामगारांच्या खात्यात जमा केले.
सफाई कामगारांना संपूर्ण थकीत वेतन मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, उर्वरित पाच महिन्यांचे वेतन कधी मिळणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे कामगारांमध्ये अस्वस्थता असून, शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
कामगार संघटनांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जोपर्यंत संपूर्ण वेतन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही. प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस कामगार कर्मचारी विभाग शेख जैरुद्दीन (छोटू भाई) यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.
काम करूनही महिनोंमहिने वेतन न मिळणे, हा कामगारांसाठी मोठा अन्याय आहे. एक महिन्याचे वेतन मिळाले असले तरी संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत लढा सुरू राहील, असे शेख जैरुद्दीन यांनी स्पष्ट केले.
कामगारांनी येत्या काही दिवसांत थकीत वेतनाची मागणी पूर्ण झाली नाही, तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. शासनाने तातडीने संपूर्ण वेतन अदा करून कामगारांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.













