अहेरी:अवैध दारू वाहतूक व विक्रीवर पोलीस कितीही अंकुश लावण्याचा प्रयत्न करीत असले तरी छुप्या मार्गाने दारू तस्करी केली जात आहे.असाच काही प्रकार जिमलगट्टा परिसरात उघडकीस आला आहे.जिमलगट्टा वरून काही अंतरावर असलेल्या पत्तीगाव येथील एका पडीक झोपडीत अवैध देशी-विदेशी दारू साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत दसुरकर आणि त्यांच्या चमूने धाड टाकून देशी-विदेशी दारुसह तब्बल २ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आदेश यादव रा.जिमलगट्टा याला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिमलगट्टा येथील आदेश यादव याने आपल्या साथीदारांच्या मदतीने दुर्गम भाग असलेल्या पत्तीगावात एका पडीक झोपडीत देशी-विदेशी दारू साठवून ठेवल्याची माहिती ९ मार्च रोजी जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत दसुरकर यांना मिळाली.पत्तीगाव हे अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत दसुरकर यांनी आपल्या चमुसोबत पत्तीगाव गाठले.येथील पडीक झोपडीत धाड टाकून देशीविदेशी दारूच्या तब्बल २० पेट्या जप्त केले.
जप्त केलेल्या दारूची किमंत २ लाख ३६ हजार रुपये व एक दुचाकी ज्याची किंमत ५० हजार रुपये आहे.असे एकूण २ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईने परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
अवघ्या काही दिवसांत होळी आणि रंगपंचमी सण असल्याने अवैध दारू विक्रेते मोठ्या प्रमाणात देशीविदेशी दारू साठवणूक करून ठेवत आहेत.
पोलिस वारंवार दुर्गम भागात जाणार नाही म्हणून दारू विक्रेते आता अश्याच भागात दारू लपवून ठेवण्याची नवी शक्कल शोधली आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे.दुर्गम भागातील तरुण पिढी अवैध दारू व्यवसायात गुंतल्याचे दिसून येत आहे. अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशीच कारवाईची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.













