वरोरा │ विविध मागण्यांसाठी दिनांक १० मार्च रोजी वरोरा येथे राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी प्रशासनाला पत्राद्वारे दिला. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक वरोरा यांच्या वतीने ५ मार्च रोजी शेतकरी शिष्टमंडळाची बैठक बोलावण्यात आली.
या बैठकीत पोलीस प्रशासनाने संबंधित सर्व विभागांना पत्र व्यवहार केल्याचे सांगत शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच ७ मार्च रोजी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना बोलावले. मात्र, शेतकऱ्यांच्या निवेदनातील मागण्या कॅबिनेट मंत्र्यांच्या स्तरावरील असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांनी निर्णय देणे शक्य नसल्याचे सांगितले.
संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर शेतकरी शिष्टमंडळाने मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला. त्यामुळे आता प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रसिंग शिंदे, तालुका कृषी विभागाच्या डोईफोडे, वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता बदकल, सहाय्यक उपनिबंधक दिवसे तसेच शेतकरी नेते किशोर डुकरे, तुकाराम निब्रड, मनोज काळे, तुलसी आलम आणि अरविंद झाडे आदी उपस्थित होते.













