मारेगाव : प्रतिनिधी :- मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथे जुन्या वादातून एका २९ वर्षीय तरुणावर कोंबड्या कापण्याच्या चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. कृष्णा भय्याजी भोयर असे जखमी तरुणाचे नाव असून, या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा भोयर हे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मित्रांसह त्रिवेणी बारजवळील रस्त्यावर उभे होते. यावेळी मोहन बापुराव मसगवळी (वय ५०, रा. वरूड, ह.मु. मांगरूळ) याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून कृष्णा यांच्याशी वाद घातला. त्यानंतर कृष्णा व त्यांचे मित्र तेथून निघून राजगडकर यांच्या घराजवळ गेले.
दरम्यान, आरोपी तेथे पोहोचला. धक्काबुक्कीवरून पुन्हा वाद निर्माण झाला आणि संतप्त आरोपीने जवळील चाकूने कृष्णा यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. उपस्थित मित्रांनी त्यांना तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या प्रकरणी कृष्णा भोयर यांच्या जबानी रिपोर्टवरून मारेगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ठाणेदारांच्या आदेशानुसार जीपीएसआय सुंकरवार पुढील तपास करीत आहेत.










