मूल प्रतिनिधी :- मुल शहरातील विहीरगाव परिसरात किरकोळ वादातून रीतिक शेंडे (वय 25) या युवकाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना काल रात्री 10:30 वाजताच्या सुमारास घडली असून, शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रीतिक शेंडे हा विहीरगाव परिसरात राहत होता. पंचायत समितीसमोरील महामार्गावर चार-पाच युवकांनी त्याला थांबवून वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी रीतिकवर ठिकठिकाणी चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत रीतिकला तातडीने स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
प्राथमिक तपासात मारेकरी गांजाच्या व्यवसायात गुंतले असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले आहे. आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
शहरात अवैध धंदे आणि गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे.
पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा आढावा घेतला असून, गुन्हेगारी प्रवृत्तीवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.












