मोहोळ प्रतिनिधी:
मोहोळ तालुक्यातील नरखेड परिसरातील लोणारी वस्ती येथे बिबट्याने यशवंत लोणारी यांच्या शेळीवर हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री दोन वाजता अनगर रस्त्यावरील वस्तीवर हा हल्ला झाला.
हल्ल्याचा तपशील:
बिबट्याने घरासमोर बांधलेल्या शेळीवर हल्ला केला. यावेळी शेळी व इतर जनावरांच्या ओरडण्याने यशवंत लोणारी व त्यांच्या मुलांनी बाहेर येत बॅटरीच्या प्रकाशात पाहिले असता, बिबट्याने शेळीला गळ्याला धरले होते. लोणारी व त्यांच्या कुत्र्याच्या आरडाओरडीनंतर बिबट्याने शेळीला सोडून तुरीच्या शेतात पळ काढला.
वन विभागाची कारवाई:
घटनेची माहिती मिळताच वनरक्षक शुभांगी कोरे, बापू वाघमोडे, व रावसाहेब माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मिळालेल्या ठशांवरून हल्ला बिबट्यानेच केल्याचे स्पष्ट झाले. शेळीवर झालेल्या जखमा खोल असल्याने हल्ल्याचा प्राणघातक स्वरूप सिद्ध झाले आहे.
बिबट्याच्या हालचालींमुळे घाबरट वातावरण:
खैराव, बुद्रुकवाडी आणि भैरववाडी या भागात मागील दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले होते. नरखेड परिसरात साखर कारखान्यांमुळे ऊस तोड सुरू आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.
शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन:
वन विभागाने शेतकऱ्यांना जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधण्याचे आवाहन केले आहे. तसेच बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट:
वनरक्षक शुभांगी कोरे यांनी लोणारी यांच्या वस्तीवरील हल्ल्याच्या पाहणीनंतर बिबट्याचे ठसे आढळल्याचे सांगितले. त्यांनी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना करून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांची मागणी:
शेतकऱ्यांनी वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.












