मुल: मुल तालुक्यातील खाणकाम व्यवसाय आणि उद्योगांच्या वाढत्या गरजांमुळे येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याची मागणी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या संदर्भात मुंबईतील मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण सहसचिव संतोष खोरगडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
ना. मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनवर संवाद साधून मुल येथे पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली. या मागणीला चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
स्थानिकांची मागणी व औद्योगिक गरजा:
चंद्रपूर जिल्ह्यात खाणीचे उत्खनन आणि त्यावर आधारित उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मुल तालुक्यात कुशल मनुष्यबळाची गरज वाढत असली तरी उच्च तांत्रिक शिक्षणाच्या सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी इतर शहरांमध्ये जावे लागते. या गैरसोयीमुळे तालुक्यातील आर्थिक आणि सामाजिक विकासावर विपरीत परिणाम होत आहे.
प्रस्तावित तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे फायदे:
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू झाल्यास स्थानिक युवकांना तांत्रिक शिक्षण घेता येईल. त्यामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि रोजगाराच्या संधी वाढतील.
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे मुल तालुक्यातील तांत्रिक शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. स्थानिकांसाठी ही मोठी संधी ठरणार असून उद्योग विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.