वरोरा :- वरोरा तालुका क्रीडा संकुलात दरवर्षी आयोजित होणाऱ्या मनोरंजन कार्यक्रमांमुळे खेळाडूंना सरावासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुळे क्रीडा क्षेत्रात प्रगती करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, खेळाडूंनी याविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
वरोरा शहरातील एकमेव तालुका क्रीडा संकुल शालेय विद्यार्थी आणि तरुण खेळाडूंना त्यांच्या कौशल्याला वाव देण्याचे ठिकाण आहे. येथे दररोज विविध खेळांचे सराव चालतात, ज्यामुळे अनेक विद्यार्थी राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. शालेय स्तरावर खेळण्यातून मिळणारे २० गुण आणि क्रीडा कोट्यांतर्गत मिळणाऱ्या संधींमुळे विद्यार्थ्यांसाठी या संकुलाचे महत्त्व अधिक आहे.
परंतु, दरवर्षी संकुलात होणाऱ्या मनोरंजन कार्यक्रमांमुळे खेळाडूंना सरावासाठी हक्काचे मैदान गमवावे लागते. यामुळे खेळाडूंचा सराव खोळंबतो, आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या क्रीडा कौशल्यावर होतो.
सामाजिक कार्यकर्ते आलेख रठ्ठे यांच्या नेतृत्त्वात खेळाडूंनी तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करत प्रशासनाला याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. त्यांनी मागणी केली आहे की, मनोरंजनासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जावी आणि क्रीडा संकुल फक्त खेळाडूंना सरावासाठीच खुले ठेवावे.
खेळाडूंच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास खेळाडूंचे भवितव्य धोक्यात येईल आणि खेळ क्षेत्रात वरोऱ्याची ओळख कमी होईल. यावर प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.