कोपरगाव :प्रतिनिधी
कोपरगाव शहरातील रस्ते होतील चकचकीत! मुख्यमंत्र्यांकडून सिमेंटच्या रस्त्यांसाठी दीड कोटीचा निधी; जिल्हाप्रमुख नितीन औताडेंची माहिती
कोपरगाव : कोपरगाव वासियांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असून कोपरगाव शहराच्या नागरी सेवा व सुविधा या कामाच्या माध्यमातून विकासाला गती मिळावी याकरिता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी पाठपुरावा केलेला होता.
या पाठपुराव्याला आता यश मिळाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या विषयीची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिलेली आहे. प्राप्त झालेला हा दीड कोटीचा निधी शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व सुशोभीकरण याकरिता वापरला जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
शहरातील कोणत्या प्रभागातील कोणत्या रस्त्यांसाठी किती निधी वापरला जाईल?
शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, प्राप्त झालेला हा दीड कोटी रुपयांचा निधी प्रामुख्याने शहरातील रस्ता कॉंक्रिटीकरण व सुशोभीकरणासाठी वापरला जाणार आहे.
या अगोदर देखील कोपरगावच्या विकासात भर पडावी याकरिता अवताडे यांनी जॉगिंग ट्रॅक करिता एक कोटी रुपयांचा निधी आणला होता व आता मंजूर झालेल्या या दीड कोटी रुपयांच्या निधीमध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये आहेर वखार ते शिंदे घर रस्ता कॉंक्रिटी करण्यासाठी पंधरा लाख रुपये,शंकर नगर येथे विसपुते घर ते ओम नगर पुल रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी 15 लाख रुपये,
प्रभाग क्रमांक तीन मध्ये सुभद्रा नगर येथील रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यासाठी 15 लाख रुपये, प्रभाग क्रमांक चार मध्ये अन्नपूर्णा नगर ते बागुल वस्ती येथे दत्त मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक व सुशोभीकरण करण्याकरिता 15 लाख रुपये, प्रभाग क्रमांक सहा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोहेगाव नागरी पतसंस्था रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याकरिता 15 लाख,
प्रभाग क्रमांक दहा मध्ये संजय नरोडे घर ते एकविरा किराणा दुकान रस्ता कॉंक्रिटीकरण 15 लाख, प्रभाग क्रमांक 11 मध्ये हनुमान येथील खांडेकर घर ते हनुमान मंदिर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 15 लाख व गांधीनगर मधील गांधीजींचा पुतळा ते मंजुळा घर रस्ता कॉंक्रिटीकरण 15 लाख,
प्रभाग क्रमांक 12 मध्ये मारुती मंदिराचे सुशोभीकरण करण्यासाठी 15 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 14 मध्ये बेट ते कचेश्वर मंदिर रोड खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 15 लाख रुपये अशा प्रकारचा निधी खर्च केला जाणार आहे.
यामुळे कोपरगाव शहराच्या विकासाकरिता निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे व इतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.