*मूल प्रतिनिधी*
बल्लारपूर (७२) विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्यावर विरोधकांनी अशोभनीय प्रचार केला आहे. समाजातील विविध स्तरांतून मिळालेल्या पाठिंब्यामुळे गावतुरे यांच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ होत असून, त्यांना युवा, शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, ओबीसी, महिला, डॉक्टर, वकील, तसेच पुरोगामी विचारवंतांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. महिलांचे कणखर नेतृत्व म्हणून उभ्या राहिलेल्या गावतुरे यांच्या यशाची भीती विरोधकांना जाणवू लागली आहे, म्हणूनच त्यांच्या प्रचार बॅनरवर शेणफेक करून त्यांचा अपमान करण्यात आला.
गावतुरे यांच्या समर्थकांनी विरोधकांच्या या वर्तनाचा निषेध केला असून, अशा प्रकारे प्रचाराची पातळी घसरवणे निवडणूक प्रक्रियेला अपमानजनक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, लोकसभेच्या प्रचारादरम्यान विद्यमान आमदारांनी महिलांचा अपमान केल्याने त्यांचा पराभव झाला होता, हे स्थानिक नागरिकांच्या आठवणीत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्यासारख्या कणखर महिला उमेदवाराचा विजय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.