गंगापूर : वैजापूर-गंगापूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर सुरू असून सर्वपक्षीय नेते मतदारांच्या भेटीसाठी गावागावात जात आहेत. मात्र, याच मतदारसंघातील भागाठाण ते शंकरपूर दरम्यानच्या दीड किलोमीटर रस्त्याची दुरवस्था हा चर्चेचा विषय ठरला आहे.
आमदार प्रा. रमेश बोरणारे यांनी सत्तेत आल्यावर मतदारांचे आभार मानत एकदा जाहीर केले होते की, “ज्या गावात डांबरी रस्ता नसेल, त्या गावात 2024 ला मतदान मागायला जाणार नाही.” परंतु, गंगापूर तालुक्यातील भागाठाण ते शंकरपूर या रस्त्याची 25 वर्षांपासून दुरवस्था कायम आहे. या रस्त्यावर खड्डा आहे की, खड्ड्यात रस्ता हेच ओळखणे कठीण झाले आहे, अशी नाराजी मतदारांत आहे.
गावकऱ्यांचा आरोप आहे की, आमदार बोरणारे यांनी या रस्त्याचे काम का केले नाही? त्यामुळे बोरणारे यांनी दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला की काय, अशी चर्चा जोरात सुरू आहे. या दीड किलोमीटर रस्त्यावर प्रवास करणे इतके कठीण झाले आहे की, “शामको शंकरपूर जाने निकले तो होता हैं सवेरा,” अशी अवस्था जनतेवर आली आहे.
मतदारसंघात रस्त्याच्या या अवस्थेमुळे नागरिकांत नाराजी आहे आणि यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.