मुल, प्रतिनिधी: नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा महत्त्वाचा आधार ठरतो. मात्र, विमा उतरवल्यानंतरही वेळेत भरपाई मिळत नसल्याचा अनुभव धान उत्पादक शेतकऱ्यांना येतो आहे. मुल तालुक्यातील पात्र शेतकरी 2023 च्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत असून, अद्याप त्यांना रक्कम प्राप्त झालेली नाही.
मुल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धान पिकाची शेती केली जाते. कापूस आणि सोयाबीनसारख्या पिकांचेही लागवड क्षेत्र आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे धान उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. परिणामी, उत्पादन घटल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नुकसानभरपाईसाठी शासनाच्या पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत भारतीय कृषी विमा कंपनीकडून विमा उतरवण्यात आला होता. मात्र, नुकसानीची माहिती दिल्यानंतरही शेतकऱ्यांना विमा रक्कम अद्याप मिळालेली नाही.
आनंदाचा दिवाळी सण तोंडावर असताना शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. विमा कंपनीकडे पैसे उपलब्ध असतानाही अद्याप भरपाई दिली गेलेली नाही. पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
“गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वेळेवर विमा कंपनीला कळवले असून, अजून विमा रक्कम मिळालेली नाही,” असे अनिल निकेसर, फिस्कुटी येथील शेतकरी, यांनी सांगितले.
शासनाने आणि विमा कंपनीने तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.