अहेरी:-राज्यात विधानसभा निवडणुकीची बिगुल वाजली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याअनुषंगाने आदिवसीबहुल व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात देखील तीन विधानसभेत निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी केली जात आहे.बुधवारी २३ ऑक्टोबर रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी ६९-अहेरी (अनु जमाती) विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात भेट देऊन निवडणूक बाबतच्या तयारीचा आढावा घेतला.यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कल्याणम उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांचे प्राणहिता येथे आगमन होताच अहेरीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुशल जैन,एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी नमन गोयल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे भेट देऊन विविध शाखांची पाहणी केली. विशेष म्हणजे नामनिर्देशन, छाननी, चिन्ह वाटप आणि दैनंदिन अहवाल शाखेत त्यांनी कामकाजाची पाहणी करत कर्मचार्यांशी संवाद साधला.
त्यांनतर त्यांनी तहसील कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन विविध विषयांवर केले.निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कल्याणम यांनी निवडणूक खर्चाचा आढावा घेतला. यावेळी अहेरीचे निवडणूक अधिकारी कुशल जैन,एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी नमन गोयल,अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील, एटापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे, भामरागड चे तहसीलदार किशोर बागडे, सिरोंचाचे तहसीलदार, निलेश होनमारे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.