अहेरी:भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यावर प्रशासन आता सज्ज झाले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील ६९-अहेरी विधानसभा मतदार संघाची निवडणूकीची धुरा नवनियुक्त तरुण अधिकारी कुशल जैन सांभाळणार आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार २९ ऑक्टोबर ही नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख असून ३० ऑक्टोबर रोजी नामांकन छाननी केली जाणार आहे.तर ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे आणि २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी प्रशासनाला देखील सज्ज राहून कामकाज सांभाळावे लागणार आहे.त्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुशल जैन यांच्यासोबत एटापल्लीचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नमन गोयल तरुण अधिकारी पाच तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,नायब तहसीलदार तसेच पंचायत समितीचे प्रशासन अधिकाऱ्यांसह आदी अधिकारी आणि शेकडो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक विषयक महत्वाची कामे सांभाळणार आहेत.
विशेष म्हणजे नियंत्रण व समन्वयक शाखा,नामनिर्देशन,छाननी,चिन्ह वाटप आणि दैनंदिन अहवाल तसेच मतपत्रिका छपाई शाखा हे अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्याकडे आहे.आदर्श आचार संहिता शाखा ही अहेरीचे गटविकास अधिकारी राहुल वरठे,टपली मतपत्रिका शाखा व मतदान पथक आदेश व नियोजन शाखा भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे,मतदार यादीचे चिन्हांकित प्रती तयार करण्याचे काम सिरोंचाचे तहसीलदार निलेश होनमोरे,ईव्हीएम व व्हीव्हीपॅट शाखा तसेच मतदान प्रशिक्षण शाखा मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील आणि ईव्हीएम सुरक्षा शाखा तसेच व्यवस्था शाखा हे एटापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे,लेखा शाखा अहेरीचे कोषागार अधिकारी नामदेव कुसराम,तक्रार व एक खिडकी समन्वयक कक्ष शाखा अहेरीचे मुख्याधिकारी गणेश शहाणे तर मीडिया शाखा ही मुलचेराचे नायब तहसीलदार एल बी उसेंडी यासह असे एकूण २३ शाखा नायब तहसीलदारसह विविध अधिकारी सांभाळणार आहेत.उपविभागीय कार्यालयाच्या आवारात विविध स्टॉल लावून कामकाजाला सुरुवात करण्यात आले असून प्रत्येक छोट्या छोट्या बाबींवर निवडणूक निर्णय अधिकारी कुशल जैन यांनी नजर ठेवली आहे.
पंचायत व तहसील कार्यालयात शुकशुकाट
१५ ऑक्टोबर ला निवडणुका घोषित होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली.निवडणूक कामासाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. सिरोंचा,भामरागड, एटापल्ली, मुलचेरा,अहेरी येथील तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी अहेरीत दाखल झाले आहेत.एवढेच नव्हेतर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार आणि कर्मचारी देखील निवडणूक कामात व्यस्त असल्याने पाचही तालुका मुख्यालयातील तहसील व पंचायत समिती कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक,२०२४ च्या अनुषंगाने ६९-अहेरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक विषयक महत्वाची कामे नियोजनबद्ध व विहित कालावधीत होण्याच्या दृष्टीने अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध कामे नेमून दिले आहे.यात विभाग प्रमुखांची महत्वाची भूमिका राहणार आहे.यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे.
-कुशल जैन,निवडणूक निर्णय अधिकारी, अहेरी