अहेरी:अतिदुर्गम व आदिवसीबहुल भाग म्हणून ओळख असलेल्या ६९-अहेरी विधानसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात स्वीप अंतर्गत मतदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.२२ ऑक्टोबर रोजी एटापल्ली,अहेरी आणि भामरागड तालुक्यात शिक्षक व विद्यार्थ्यांनी रॅली काढत मतदानाविषयी जनजागृती केली.
२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी शंभर टक्के मतदान करावे यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबिविण्यात येत आहेत.लोकसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्हा मतदानाच्या टक्केवारीत अग्रेसर होता.विधानसभा निवडणुकीत देखील जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी त्याअनुषंगाने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे.
मंगळवारी भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथील राष्ट्रीय सेवा योजना तसेच विद्यार्थी विकास विभागाव्दारे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अहेरी तालुक्यातील आलापल्ली शहरात स्व.लक्ष्मीबाई कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मुख्य चौकात रॅली काढून ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’, ‘सोडा सारे काम धाम मतदान करणे पहिले काम’ यासारख्या घोषणा देत १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकांनी मतदान करून देशाचे जागरूक नागरिक बनण्याचे आवाहन केले. त्यानंतर मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली.अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील चिचोळा येथे संत मानवदयाल अनुदानित आश्रम शाळेतर्फे मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.तर लाहेरी येथील शासकीय आश्रम शाळेत विद्यार्थ्यांकडून निवडणूक संदर्भात पोस्टर पेंटिंग, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आले.
दोन्ही तालुक्यात काढण्यात आलेल्या रॅलीत महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाहरी आणि विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जनजागृती मोहिमेत नागरिकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.