गडचिरोली: सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी 69-अहेरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. आत्राम अजय मलय्या (अपक्ष) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले. 67-आरमोरी (अ.ज.) व 68-गडचिरोली (अ.ज.) या दोन विधानसभा मतदारसंघात एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.
काल नामनिर्देशन सादर करण्याच्या पहिल्या दिवशी अहेरी येथून दिपक मल्लाजी आत्राम (अपक्ष) यांनी अर्ज सादर केला आहे. त्यामुळे अहेरी विधानसभा मतदार संघात आजपर्यंत एकूण दोन अर्ज दाखल झाले आहेत. तर गडचिरोली व आरमोरी विधानसभा मतदार संघात काल व आज दोन्ही दिवशी कोणाकडूनही नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले नाही.
आज 23 ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 3 व्यक्तींनी 10 नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 6 व्यक्तींनी 16 अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून 6 व्यक्तींकडून 10 अर्जाची उचल करण्यात आली आहे. जिल्ह्यात काल एकूण 57 व आज 36 असे दोन दिवसात एकूण 93 नामनिर्देश अर्जाची उचल झाली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.